अंजनगाव सुर्जी,
health-department-matter : नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत संबंधित कत्राटदार नितीन दातीर, तसेच आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे यांनी लेखी तक्रार सादर केली असून, यामुळे अंजनगाव सुर्जी नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी वृत्तपत्रात आरोग्य विभागाशी संबंधित निविदा प्रक्रियाबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२६ होती; मात्र, ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने न पार पडता त्यात वरिष्ठ स्तरावरून हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः नगराध्यक्षांनी थेट हस्तक्षेप करून निविदा प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारदारांच्या तक्रारीनुसार निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांनी मी सांगितल्याशिवाय कुणाचीही पावती फाडू नये असे आदेश दिल्याचे संबधित कर्मचार्याने कंत्राटदारास सांगितले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार नगराध्यक्ष आपल्या मर्जीतीलच कंत्राटदाराला संबंधित कंत्राट देऊ इच्छितात, असे यावरून निदर्शनास येते.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार वृत्तपत्राच्या जाहिरातीनुसार खुल्या निविदा मागितल्या असल्यावर सुद्धा नगराध्यक्षांनी निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याने कंत्राटदारासह, आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे यांनी सुद्धा नगराध्यक्षाच्या निवेदा प्रक्रियेतील हस्तक्षेपावर आक्षेप घेतला असून मुख्याधिकार्यांना तशा स्वरूपाचे पत्र त्यांनी दिले आहे. तक्रारदाराने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच निविदा प्रक्रिया पुन्हा पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, आपली पावती फाडल्या जात नाही हे कत्राटदाराच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबतचा व्हिडीओ तयार केला असून यामध्ये संबाधित कर्मचारी थेट नगराध्यक्षाला फोन लावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असल्याने प्रकरण आणखीनच तापले आहे.
हस्तक्षेप नाही
-याबाबत बोलताना नगराध्यक्ष अविनाश गायगोले म्हणाले की, निविदा प्रक्रियेत मी कोणताच हस्तक्षेप केला नाही. सदर कामे ही छोटी व महत्त्वाची आहेत. क्वालिटीचे काम झाले पाहिजे. अनियमितता आढळ्यास फेरविचार करण्यात येईल. तर मुख्याधिकारी विजय लोहकरे म्हणाले की, मी सध्या अंदाज समितीसोबत अमरावतीला आहे. सोमवारी आल्यानंतर त्यावर काय निर्णय घेता येईल ते पाहू.