डुलकीने घेतला सहा जणांचा जीव!

    दिनांक :04-May-2026
Total Views |
जालौन,
Terrible accident in Ayodhya उत्तर प्रदेशातील जालौन परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात सहा ठार झाल्याचे वृत्त आहे. जालौन-झांसी-कानपूर मार्गावर जोल्हुपूरजवळ एका वेगाने धावणाऱ्या आलिशान मोटारीने समोरील मालवाहू वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या मोटारीत बसलेले सर्वजण अयोध्येत दर्शन करून ललितपूरकडे परतत होते. जोल्हुपूर परिसरात पोहोचल्यावर चालकाला डुलकी आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि मोटार थेट पुढे असलेल्या मालवाहू वाहनाखाली घुसली.
 

Ayodhya 
 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मोटारीत अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठे प्रयत्न करावे लागले, तर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, मात्र नंतर ती सुरळीत करण्यात आली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्वजण ललितपूरमधील एका भागातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मृतदेहांचे शवविच्छेदनासाठी पाठवून अपघाताची सखोल चौकशी सुरू केली आहे.