चेन्नई,
Thalapathy Vijay as the Chief Minister तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अनपेक्षित चित्र समोर येत असून अभिनेते थलपती विजय यांच्या पक्षाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये विजय यांच्या पक्षाला शंभरहून अधिक जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. दोनशेहून अधिक मतदारसंघांचे कल समोर आल्यानंतर त्यांच्या पक्षाने दमदार मुसंडी मारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विजय यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. याचवेळी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यातही चुरशीची लढत सुरू असली तरी विजय यांच्या पक्षाने त्यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे.

द्रमुक सुमारे पन्नासच्या पुढे तर अण्णाद्रमुक सत्तरच्या आसपास जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. मतमोजणी पुढे सरकत असताना विजय यांच्या पक्षाने शंभरचा टप्पा पार केल्याने राज्याच्या सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षे दोन प्रमुख पक्षांभोवती फिरणाऱ्या तामिळनाडूच्या राजकारणात विजय यांच्या प्रवेशामुळे नव्या समीकरणांची निर्मिती झाली आहे. मतपेट्या उघडल्यानंतर जनतेने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले असून राज्यात यावेळी एकतर्फी सत्ता येण्याऐवजी तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, सामाजिक माध्यमांवर विजय मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांनाही उधाण आले असून अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.