गडचिरोली,
ashok nete देशाच्या आणि राज्याच्या उभारणीत कामगारांचा घाम सांडलेला आहे. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकीतून युवा मोर्चाने राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनु. जमाती मोर्चा) अशोक नेते यांनी केले.
1 मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोलीच्यावतीने राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ सुरुवात करून शहरातील कष्टकरी कामगारांचा सन्मान करण्यात आला. कडाक्याच्या उन्हात काम करणार्या कामगारांना दिलासा मिळावा या उद्देशाने त्यांना अन्नधान्य किट, टोपी, टी शर्ट आणि हातमोजे (ग्लोव्हज) यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार नामदेव उसेंडी, किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर यांची विशेष उपस्थिती होती.
वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता फिल्डवर काम करणार्या मजुरांना टोपी, टी शर्ट आणि हातमोजे मिळाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले.ashok nete अन्नधान्य किटच्या माध्यमातून अनेक गरजू कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न भाजयुमोने केला आहे. गडचिरोली भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर केशव भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष रजत वंजारी, जिल्हा सचिव गायत्री सोमणकर, शहर अध्यक्ष साई सिलमवार यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.