तभा वृत्तसेवा
उमरखेड,
world-cartoon-day : वर्तमानपत्र आणि नियतकालिकांमधील बोलकी व्यंगचित्र नेहमीच विचार करण्यास प्रवृत्त करतात. या व्यंगचित्रांमधील रेषा मानवी स्वभाव, भूमिका, जनभावना मांडत असतात, असे प्रतिपादन उमरखेड ख्यातनाम व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांनी जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त केले.
खरं तर व्यंगचित्र रेखाटने ही एक निरंतर प्रक्रिया आहे. तिला निश्चित आरंभ आणि शेवट नाही. समाजातील एखादी घटना समजावून घेणं, त्यातील विसंगती शोधणं आणि व्यापक जनहित लक्षात घेऊन ती मांडणं हे अत्यंत जबाबदारी व संयमाचं काम आहे. व्यंगचित्र रेखाटनासाठी सतत निरीक्षण करावे लागते. व्यंगचित्रकाराला समाजभानही आवश्यक आहे. त्यासाठी सतत वाचनही असावं लागतं. एखाद्या संपादकीय लेखाप्रमाणे ही व्यंगचित्रेही प्रबोधनाची परंपरा निभावत आली आहेत, असेही ते म्हणाले.
एका बाजूला समाजातील घटना, घडामोडी, व्यक्ती यांच्याशी समरस व्हायचं, पण त्यात गुंतायचं नाही, एखाद्याचं वाईटपण व्यंगचित्रातून मांडायचं पण त्याचा अनादर करायचा नाही. एखादी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही, पण ती जनहिताची असल्यास त्याला प्राधान्य द्यायचं, अशी तारेवरची कसरत करायची, पण कुठेही तोल ढळू द्यायचा नाही असे करतच व्यंगचित्रकार आपलं काम नीटपणे करत असतो, असेही दिघेवार म्हणाले.
जगभर 5 मे हा व्यंगचित्र दिन म्हणून साजरा केल्या जातो. 1895 मध्ये याच दिवशी जोसेफ पुलित्झर यांच्या ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’मध्ये हास्य आणि व्यंग यांची उधळण असलेल्या ‘द यलो किड’ या कॉमिक्सचे प्रकाशन झाले होते. त्याला वर्तमान युगातील व्यंगचित्रांचा प्रारंभ मानला जातो.
व्यंगचित्र विनोदीच असते असे नव्हे, तर ते मार्मिक, प्रबोधनात्मक, बोचरेसुद्धा असतात. मराठी व्यंगचित्र क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे, शि. द. फडणीस, वसंत सरवटे, वसंत हळबे, प्रभाकर ठोकळ, मंगेश तेंडुलकर, विकास सबनीस असे अनेक नामवंत व्यंगचित्रकार वेगवेगळ्या शैलीत वाचकांना हसवत व अंतर्मुख करत.
त्यांचाच वारसा पुढे जपण्याची आजची व्यंगचित्रकार मंडळी प्रयत्न करीत आहेत. विनोदबुद्धी, वाचनक्षमता यांसोबतच चित्रकलेचा थोडासा गंध तुमच्याकडे असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या भावनेला, मनातल्या विचारांना, विनोदबुद्धीला कागदावर उतरवा, असे व्यंगचित्रकार दिनानिमित्त प्रभाकर दिघेवार यांनी सुचविले.