मुंबई
Eknath Shinde पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत हा निकाल ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. बंगालमध्ये झालेला हा बदल विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असताना शिंदे यांनी सामाजिक माध्यमांद्वारे प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “हा दिवस भाजपासाठी ऐतिहासिक आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले असून जनतेने गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराला नाकारत विकास, स्थैर्य आणि शांततेला मत दिले आहे.”शिंदे यांनी पुढे सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून अमित शाह यांच्या रणनीतीमुळे हा विजय शक्य झाला आहे. “भाजपाचे कार्यकर्ते दडपशाहीला न जुमानता ठामपणे लढले. त्यामुळे हा विजय केवळ राजकीय नाही, तर लोकशाहीच्या बळकटीकरणाचे प्रतीक आहे,” असे त्यांनी नमूद केले.पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराचे संकेत मिळत असताना शिंदे यांनी ‘डबल इंजिन’ सरकारमुळे राज्यात विकासाची गती वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. Eknath Shinde “बंगालमध्ये आता विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल. या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, देशातील इतर राज्यांतील निवडणुकांमध्येही भाजपाला सकारात्मक यश मिळत असल्याचे दिसत आहे. विशेषतः आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र असून, यामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाची ताकद अधिक बळकट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.पश्चिम बंगालमधील या निकालामुळे देशातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काही दिवसांत अंतिम निकाल स्पष्ट झाल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.