सातपुडा पर्वतरांगेत पेटला वणवा

वनविभागाची रात्रंदिवस धावपळ

    दिनांक :04-May-2026
Total Views |
मोर्शी, 
morshi-fire : तालुक्यातील चिंचोली गवळीपासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशाची सीमा सुरू होत असून याच सीमेलगत असलेला दक्षिण सातपुडा पर्वत सध्या भीषण वणव्याच्या विळख्यात सापडला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या पर्वतरांगांमध्ये कुठल्याही प्रकारची आग लागली नव्हती. त्यामुळे वनविभागासह परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. शासनानेही सलग तीन वर्षे आग न लागल्याने येथील नागरिकांना प्रोत्साहनपर मोबदला दिला होता. मात्र यंदाच्या वाढत्या उष्णतेमुळे सातपुड्याच्या जंगलात पुन्हा एकदा आगीचे संकट उभे ठाकले आहे.
 
 
MORSHI
 
 
 
सध्या सातपुडा पर्वतातील अंबादेवी, खोखरा, गारगोटीचा जंगलपट्टा, सालबर्डी परिसर, गायमुख परिसर आदी भागांत मोठ्या प्रमाणात जंगलाला आग लागली असून आगीने भीषण रूप धारण केले आहे. या आगीमुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांतील सीमेलगतच्या गावांना उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका बसत आहे. दिवसभर अंगाची लाही लाही करणारी उष्ण हवा आणि गरम वाफांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. वनविभागाचे कर्मचारी, वनरक्षक आणि वनमित्र आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. मात्र सातपुड्याचा डोंगराळ आणि दुर्गम भूभाग, त्यात सतत वाहणारे पहाडी वारे यामुळे आग विझवण्याचे काम अत्यंत कठीण ठरत आहे. एका ठिकाणी आग नियंत्रणात आली की, वार्‍याच्या झोताने दुसर्‍या ठिकाणी ती पुन्हा भडकत असल्याने वन कर्मचार्‍यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
 
 
विशेष म्हणजे मध्य प्रदेश वनविभागाचे कर्मचारी आणि वनमित्रही रात्रीच्या वेळी जंगलात उतरून आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे दोन्ही राज्यांच्या वनयंत्रणेची झुंज अधिक तीव्र झाली आहे.