पुणे,
35 children die every day in maharashtra राज्यात बालमृत्यू रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सातत्याने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांत या मृत्यूंच्या प्रमाणात घट झाली असली तरी परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली नाही, असे चित्र आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.सन २०२५-२६ या वर्षात राज्यात एकूण १२ हजार ७९२ बालमृत्यू नोंदवले गेले आहेत. याचा अर्थ दररोज सरासरी ३५ बालकांचा मृत्यू होत असल्याचे स्पष्ट होते. काही वर्षांपूर्वी ही सरासरी ४५ इतकी होती, त्यामुळे काही प्रमाणात सुधारणा दिसत असली तरी आव्हान अद्याप कायम आहे.
आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक बालमृत्यूची सखोल तपासणी करण्यासाठी विशेष समित्या कार्यरत आहेत. तसेच महिला आणि बालविकास विभागाशी समन्वय साधून गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले जात आहे, कारण बालकांचे आरोग्य हे मातांच्या आरोग्यावर अवलंबून असते.लसीकरण मोहिमाही अधिक मजबूत करण्यात आली असून ग्रामीण भागातही आरोग्य पथके पोहोचून कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये याची काळजी घेत आहेत. बालमृत्यूमागे अकाली जन्म, जन्मतः कमी वजन, श्वास घेण्यास अडचण, संसर्गजन्य आजार, न्यूमोनिया, सेप्सिस तसेच जन्मजात व्यंग ही प्रमुख कारणे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.