पुणे,
purandar-airport : पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला निश्चित झाल्यानंतर सोमवारपासून प्रत्यक्ष जमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू करण्यात आले.
पहिल्याच दिवशी प्रशासनाने सुमारे साडेचारशे एकर जमीन ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही प्रक्रिया “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर राबवली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली आहे, त्यांच्या जमिनीचे करारनामे करून त्यांना तत्काळ मोबदला दिला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधून एकूण सुमारे तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठीची सर्व प्रशासकीय प्रक्रिया आधीच पूर्ण करण्यात आली होती, मात्र मोबदल्यावरून काही विलंब झाला होता. राज्य सरकारने नुकताच दर निश्चित केल्यानंतर आता कामाला गती मिळाली आहे.
भूसंपादनासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज हुडकोकडून मंजूर करण्यात आले असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील निधी जिल्हा प्रशासनाला मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता संपूर्ण प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे.
या प्रकल्पात फक्त जमीनच नाही तर घरे, झाडे, विहिरी आणि फळबागांचेही स्वतंत्र मूल्यांकन करून भरपाई दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
या विमानतळ प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास होणार असल्याचे सांगितले जात असले तरी काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि चर्चाही सुरू आहे.