विवाह मुहूर्त पाळायचा नसेल तर पत्रिकेत छापताच कशाला?

वरपक्षाकडील मंडळींच्या बेभान नाचण्यामुळे लग्नमुहूर्ताला हरताळ

    दिनांक :06-May-2026
Total Views |
आजनसरा,
aajansara marrage सध्या सर्वत्र विवाहाची धामधूम सुरू आहे, परंतु वर पक्षाकडून लग्न सोहळ्यातील पवित्र मुहूर्तालाच हरताळ फासला जात असल्याचे धकादायक चित्र समोर आले आहे. वर पक्षाकडील मंडळींच्या बेभान नाचगाण्यामुळे लग्नमुहूर्त तब्बल दोन-दोन तास लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे लांबून आलेल्या पाहुण्यांचा खोळंबा होऊन प्रचंड हिरमोड होत आहे. त्यामुळे पत्रिकेत छापलेला मुहूर्त नावापुरताच उरलाय आहे.
 
 

aajansara marrage
 
 
दुपारी १०.३० चा मुहूर्त असं पत्रिकेत ठळक लिहिलेलं असतं, पण वरातच दुपारी १ ला मंडपात पोहोचते. तोपर्यंत डिजेच्या तालावर वरपक्षाच्या मित्रांचा नाच सुरूच असतो. भटजी हातात अक्षता घेऊन ताटकळत बसतात आणि वधूपक्षाची नुसती धावपळ सुरू असते. वेळेवर पोहोचण्यासाठी धावपळ करणार्‍या पाहुण्यांना मुहूर्त टळल्याचं कळताच संताप अनावर होतो. मुहूर्तावर अक्षता टाकून जेवायचं या विचाराने आलेले अनेक पाहुणे लग्न लागण्याआधीच जेवणाचा आस्वाद घेऊन मोकळे होतात. काहीजण तर मुहूर्त होईपर्यंत थांबायला आम्हाला वेळ नाही म्हणत जेवण करून परत फिरत आहेत.
 
एकीकडे मंडप, जेवणावळी, फोटोग्राफर सगळ्यांचं टाईमटेबल कोलमडतंय.aajansara marrage दुसरीकडे पाहुण्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना वधूपक्ष मेटाकुटीला येतो. आमची काय चूक? आम्ही तर सकाळपासून तयार आहोत. वरपक्षालाच वेळेचं भान नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वधूच्या वडिलांकडून दिल्या जातात.
पत्रिकेत मुहूर्तच नका टाकू!
जर मुहूर्त पाळायचाच नसेल तर पत्रिकेत वेळ छापून आमची दिशाभूल कशाला करता? एकतर डिजे लावा किंवा मुहूर्त पाळा. दोन्ही एकत्र जमत नसेल तर लग्नपत्रिकेतून मुहूर्ताची वेळच हद्दपार करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. लग्न हे दोन जीवांचे मिलन आहे. पण वरपक्षाच्या बेशिस्तीमुळे ते पाहुण्यांसाठी मनस्ताप ठरत आहे. वेळ ही संपत्ती आहे, आणि लग्नसोहळ्यात तरी तिचं बंधन पाळायलाच हवं, अशी खरमरीत प्रतिक्रिया वधू पक्षाकडून दिल्या जात आहे.