लपवले वय तरी काय कराल, AIसमोर कुठे पळाल!

इन्स्टाग्रामवर आता ‘वय लपवणं’ बंद!

    दिनांक :06-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
age-hiding-on-instagram : मेटाने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर खोटी माहिती देऊन खाती तयार करणाऱ्या किशोरवयीन वापरकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नवीन एआय-आधारित तंत्रज्ञान सादर केले आहे. अनेकदा लहान वयातील मुले आपले खरे वय लपवून सोशल मीडिया खाती तयार करतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून कंपनीने “एज अश्युरन्स टेक्नॉलॉजी” नावाचे नवीन प्रणाली आणली आहे.
 
 
 
age-hiding-on-instagram
 
 
हे तंत्रज्ञान फोटो आणि व्हिडिओंच्या विश्लेषणातून व्यक्तीचे वय अंदाजित करण्याचा प्रयत्न करते. चेहऱ्याची ओळख पटवण्याऐवजी, शरीराची रचना, उंची आणि इतर वैशिष्ट्यांवरून वयाचा अंदाज लावला जातो. तसेच वापरकर्त्यांच्या पोस्टवरील संवाद आणि वर्तनाचाही अभ्यास केला जातो, जेणेकरून वयाबाबत अधिक अचूक निष्कर्ष काढता येईल.
 
मेटाच्या नियमांनुसार १३ वर्षांखालील मुलांना खाते बनवण्याची परवानगी नाही, तर १३ ते १७ वयोगटातील वापरकर्त्यांची खाती ‘टीन अकाउंट’ म्हणून वर्गीकृत केली जातात आणि त्यांच्यावर काही सुरक्षिततेचे निर्बंध लागू असतात. नवीन प्रणालीमुळे जर एखाद्याने चुकीचे वय दिले असेल आणि तो किशोरवयीन असल्याचे आढळले, तर त्याचे खाते आपोआप ‘टीन अकाउंट’मध्ये बदलले जाईल आणि त्यावर अतिरिक्त सुरक्षा नियम लागू होतील.
 
ही सुविधा सध्या काही देशांमध्ये सुरू करण्यात आली असून हळूहळू ती इतर देशांमध्येही लागू केली जाणार आहे. कंपनीचा दावा आहे की या नव्या तंत्रज्ञानामुळे किशोरवयीन मुलांची ऑनलाइन सुरक्षितता अधिक मजबूत होईल आणि खोट्या माहितीवर नियंत्रण ठेवता येईल.