मुंबई,
aryan-singh-dadiala : अजित पवार यांच्या कार्याला समर्पित करत आर्यनसिंह दडियाला या युवकाने खुल्या समुद्रात २१० किलोमीटर पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. महाराष्ट्र सीमेजवळील क्वेरीम बीच ते कर्नाटक सीमेजवळील पोलेम बीच असा हा दोन-मार्गी सोलो मॅरेथॉन पोहण्याचा विक्रम असून तो ४९ तास ४१ मिनिटे ४ सेकंदात पूर्ण करण्यात आला.
या विक्रमादरम्यान आर्यनने २८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत अखंड पोहण्याचा पराक्रम केला. समुद्रातील कठीण परिस्थिती, जोरदार वारे, भरती-ओहोटीचे बदलते प्रवाह आणि जेलीफिशच्या दंशांचा सामना करत त्याने हा टप्पा पूर्ण केला.
आर्यनने हा विक्रम अजित पवार यांच्या विकासकामांना सलाम म्हणून समर्पित केल्याचे सांगितले. त्यांच्या कार्याचा आदर म्हणून हा निर्धार पूर्ण केल्याचेही त्याने नमूद केले. या कामगिरीनंतर त्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी येथे भेट घेऊन आपला अनुभव आणि माहिती दिली.
या मोहिमेत गोवा स्विमिंग असोसिएशन, SFI, NIWS तसेच प्रशिक्षक आणि तांत्रिक टीमचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. कठीण परिस्थितीतही सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर आर्यनने ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.