छत्रपती संभाजीनगर
Ambadas Danve शहरातील क्रांती चौकात लागलेल्या एका बॅनरमुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “तुमको क्या लगता था नही लौटेंगे, लो फिर आ गये” या हिंदी डायलॉगमुळे लक्ष वेधून घेणाऱ्या या बॅनरच्या माध्यमातून अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आणि भारतीय जनता पक्षावर अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याचे मानले जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. सर्व पक्षांच्या समन्वयातून ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून दानवे यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचे भव्य स्वागत आणि रॅली आयोजित करण्यात आली आहे.याच स्वागत सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर क्रांती चौकात लावण्यात आलेले बॅनर विशेष चर्चेचा विषय ठरले आहे. या बॅनरवर प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या चित्रपटातील लोकप्रिय डायलॉगचा वापर करण्यात आला आहे. या डायलॉगच्या माध्यमातून राजकीय संदेश देत शिंदे गट आणि भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
म्हणून वाद?
२०२२ मध्ये राज्यात Ambadas Danve झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अनेक आमदार आणि खासदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. या घटनेनंतर शिवसेनेत फूट पडली आणि राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी महाविकास आघाडीत त्यांचा प्रभाव कायम असल्याचे मानले जाते.दरम्यान, दानवे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवर “वादळातही ठाम उभा, बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक” असा उल्लेख करण्यात आला आहे. या माध्यमातून पक्षनिष्ठा अधोरेखित करत विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे बॅनर त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी लावले असल्याची माहिती आहे.यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलेल्या दानवे यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या पुनर्निवडीमुळे मराठवाड्यातील विविध प्रश्नांना विधिमंडळात अधिक प्रभावीपणे वाचा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण असून आज होणाऱ्या स्वागत सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे