अनिल कांबळे,
नागपूर,
land-mafia-dilip-gwalbanshi : उपराजधानीतील कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबंशीविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.
हरीचंद कोठीराम वाढवे (८५, काटोल मार्ग, गिट्टीखदान) यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे. वाढवे यांची मौजा बोरगाव येथील दाभा मार्ग येथील खसरा क्रमांक २०/०१ येथे जवळपास तीन एकर जागा आहे. आरोपी दिलीप ग्वालबंशीने प्रेम ग्लालबंशी व इतर साथीदारांच्या मदतीने त्यातील ३० हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण करत कब्जा केला होता. यासंदर्भात वाढवे यांनी पोलिसांत तक्रारदेखील केली होती. ५ मे रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वाढवे ग्वालबंशीच्या घराजवळील टपरीवर चहा पित होते.
त्यावेळी ग्वालबंशीने त्यांना बोलविले. तू माझ्याविरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे वकिलाकडून कळाले. हे खरे आहे का अशी ग्वालबंशीे वाढवे यांना विचारणा केली. वाढवे यांनी होकार दिला असता ग्वालबंशीने जातीवाचक शिवीगाळ केली. तुम्हाला जंगलात पाठवून देईन अशी भाषा वापरत ग्वालबंशीने वाढवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तू जी पत्रकार परिषद घेणार आहेस तेथे जायची गरज नाही असेदेखील तो वाढवे यांना म्हणाला. वाढवे यांनी त्यानंतर गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दिलीप ग्वालबंशीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.