बंगालच्या सत्ता बदलावर बांगलादेश चकित!

    दिनांक :06-May-2026
Total Views |
ढाका,
Bangladesh is surprised in Bengal पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत यशानंतर राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ झाली असून यावर शेजारी देश बांगलादेशातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तब्बल पंधरा वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले आहे. या निकालांवर भाष्य करताना बांगलादेशातील बीएनपी पक्षाचे माहिती सचिव अझीझुल बारी हेलाल यांनी आश्चर्य व्यक्त केले. तृणमूल काँग्रेसचा इतक्या मोठ्या फरकाने पराभव होईल, याची अपेक्षा नव्हती, असे त्यांनी म्हटले. त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे अभिनंदन करत या विजयामुळे पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अधिक दृढ राहतील, अशी आशा व्यक्त केली.
 
 
bangalades
 
हेलाल यांनी पुढे सांगितले की, पूर्वी ममता बॅनर्जी या तीस्ता नदीवरील धरण प्रकल्पाच्या मार्गात अडथळा ठरत होत्या. मात्र आता सत्तांतरानंतर या प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वाढली आहे. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सत्तेमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत आणि बांगलादेश यांच्यात काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी ही राजकीय घडामोड महत्त्वाची ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.