बारामती
Baramati police सोशल मीडियावर “बाजारभावापेक्षा स्वस्त गहू मिळेल” असे आमिष दाखवून व्यापाऱ्याला जाळ्यात ओढत शस्त्राचा धाक दाखवत लूट करणाऱ्या सराईत टोळीला बारामती पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हा घडवून आरोपींनी वेगवेगळ्या मार्गांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या जलद तपासयंत्रणेने आणि सायबर सेलच्या मदतीने अवघ्या पाच तासांत त्यांना अटक करण्यात यश मिळाले.
तासगाव (जि. सांगली) येथील व्यापारी सुरज सर्जेराव गावडे हे गव्हाच्या व्यवसायासाठी फेसबुकवरील जाहिरात पाहून संपर्कात आले होते. “स्वस्त दरात गहू उपलब्ध आहे” असे सांगत आरोपींनी त्यांना बारामती येथे बोलावले. ४ मे रोजी ते रोख रक्कम व वाहनासह बारामतीत दाखल झाले असता, आरोपींनी त्यांना पेन्सिल चौक, कल्याणी कॉर्नर आणि पुढे निर्जन ठिकाणी नेऊन सापळा रचला.
निर्जनस्थळी पोहोचताच टोळीने शस्त्राचा धाक दाखवत गावडे व त्यांच्या चालकाला मारहाण केली. आरोपींनी कपाळावर पिस्तूल रोखून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ आणि इतर मौल्यवान वस्तू असा सुमारे ५१,५०० रुपयांचा ऐवज लुटून पलायन केले. गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ विविध पथके तयार करून तपास सुरू केला.तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा मार्ग स्पष्ट झाला. ते सातत्याने वेगवेगळ्या गावांतून मार्ग बदलत पळत असल्याचे निष्पन्न झाले. भिगवण, वालचंदनगर आणि बारामती पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सिन्नरमास परिसरात सापळा रचला. पोलिसांनी थरारक पाठलाग Baramati police करत रात्री उशिरा तीन आरोपींना ताब्यात घेतले, तर चौथा आरोपी घरातून पकडण्यात आला.या कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे, रोख रक्कम तसेच लुटलेले दागिने असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीचा पूर्वीही गुन्हेगारी इतिहास असल्याची माहिती समोर आली असून, त्यांचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.पोलिस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर मिळणाऱ्या आर्थिक आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.