निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या!

    दिनांक :06-May-2026
Total Views |
कोलकाता,
BJP worker murdered in Bengal पश्चिम बंगालमध्ये राजकीय तणाव तीव्र झाल्याचे चित्र असून भाजप कार्यकर्त्याच्या हत्येच्या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यासह पाच जणांना अटक केली आहे. विजय मिरवणुकीदरम्यान झालेल्या हल्ल्यात ही हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपकडून काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित तृणमूल काँग्रेस नेत्यासह पाच जणांना ताब्यात घेतले.
 
 

 Bengal 
दरम्यान, कोलकात्यातील न्यू मार्केट परिसरात तृणमूल काँग्रेस कार्यालयावर बुलडोझर कारवाई झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयासह आसपासच्या दुकानांची तोडफोड केल्याचा दावाही करण्यात आला असून त्यासंदर्भातील दृश्य समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून परस्पर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणूक निकालानंतर राज्यातील विविध भागांत हिंसाचार उसळल्याचेही चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही पक्षांकडून परस्परांवर कार्यकर्त्यांच्या हत्येचे आरोप केले जात असून परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे.