लाच घेताना मंडळ अधिकारी जाळ्यात

    दिनांक :06-May-2026
Total Views |
नाशिक,
board-official-caught-taking-bribe : चांदवड तालुक्यातील वडाळी भोई परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत महिला मंडळ अधिकारीला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. योगिता आनंद भोये (वय ३८) असे या अधिकाऱ्याचे नाव असून शेतजमिनीच्या रेकॉर्ड आणि कब्जा हस्तांतर करण्याच्या कामासाठी ही लाच मागितल्याचा आरोप आहे.
 

NASHIK 
 
 
तक्रारदाराची खडक ओझर शिवारातील वडिलोपार्जित शेतजमीन होती. या जमिनीवरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत महसूल विभागाला जमीन कब्जा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी पुढील कार्यवाही करून मंडळ अधिकारी योगिता भोये यांना आदेश दिले होते.
 
मात्र, ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे सुरुवातीला ६० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले.
 
या प्रकरणानंतर परिसरात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करतानाच लाच मागितल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीविरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितली गेल्यास १०६४ या हेल्पलाईनवर तात्काळ तक्रार नोंदवावी.