वर्धा,
Bor Tiger Reserve देशातील वाघांची घटती संख्या बघता ‘प्रोजेट टायगर’ ही मोहीम राबविण्यात आली. वाघाचे संवर्धन, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही मोहीम राबवित असताना देशात अनेक व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्रात सन २०२४-२५ मध्ये व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा राबविण्यात आला. गणनेच्या प्राथमिक अहवालानंतर आता अंतिम अहवाल वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन देहरादूनच्या तज्ज्ञांनी जाहीर केला आहे. अहवालात बोर प्रकल्पात १४ प्रौढ वाघ असल्याचे नमूद करण्यात आले. यात ६ वाघ तर ७ वाघीण आणि एका लिंग न ओळख पटलेल्या वाघाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी करण्यात आलेल्या गणनेपैकी एका प्रौढ वाघाची बोर व्याघ्र प्रकल्पात भर पडली आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी उपयुत ठरत आहे. १३ हजार ८०० हेटरचे कोअर तर ६७ हजार ८१४.४६ हेटर बफर क्षेत्र असलेल्या बोर प्रकल्पात क्षेत्रफळाच्या तुलनेत वाघांची संख्या अधिक आहे. जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी अनेक सिने अभिनेता, सिने दिग्दर्शक तसेच विविध व्हीव्हीआयपींनी या प्रकल्पाला भेटी दिल्या. या व्याघ्र प्रकल्पात नेमके किती नर व मादी वाघ आहेत, त्यांचा अधिवास कोअर की बफर क्षेत्रात आदी माहिती मिळावी यासाठी सन २०२४-२५ मध्ये बफर व कोअर क्षेत्रात तब्बल ३९६ ट्रॅप कॅमेर्यांचा वापर करून व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा राबविण्यात आला. नियोजित कालावधीनंतर ट्रॅप कॅमेर्यांमध्ये कैद झालेल्या वन्यप्राण्यांचे चित्रिकरण वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशनला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून पाठविण्यात आले. याच चित्रिकरणाचे निरीक्षण करून सुरूवातीला प्राथमिक त्यानंतर आता अंतिम अहवाल बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाला मिळाला आहे.
वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशनच्या तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार बोर व्याघ्र प्रकल्पात एकूण १४ प्रौढ वाघ आहेत. यात ६ नर तर ७ मादी व एक सेस अनआयडेंटीफाईड वाघाचा समावेश आहे. १४ प्रौढ वाघांपैकी ७ वाघांचा कोअर क्षेत्रात तर ७ वाघांचा बफर क्षेत्रात अधिवास असल्याचे निरीक्षणानंतर अहवालात स्पष्ट केले आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्रात सन २०२४-२५ मध्ये व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा राबविण्यात आला. त्याचा अंतिम अहवाल नुकताच वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशनच्या तज्ज्ञांकडून बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाला मिळाला आहे. यापूर्वीच्या गणनेत बोर व्याघ्र प्रकल्पात १३ प्रौढ वाघांची नोंद घेण्यात आली होती. आता यात एका वाघाची भर पडली आहे. बोर व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघांच्या संवर्धनासाठी उपयुत ठरत असल्याची माहिती बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी बोलताना दिली.