अंजनगाव सुर्जी,
chiwali-bhaji : चिवळीची भाजी ज्याला ग्रामीण भाषेत चिवईची भाजी सुद्धा म्हटल्या जाते. विशेष म्हणजे ही भाजी उन्हाळ्यात खाल्ली जाते. कारण ही भाजी शरीरातील उष्णता कमी करते म्हणूनच विदर्भातील खाद्य संस्कृतीत चिवळीच्या भाजीला उन्हाळ्यामध्ये विशेष महत्त्व दिल्या जाते.
चिवळीची भाजी ही एक रानभाजी आहे. ज्याला चिवडी, चिवई, चिवळ तर कुठे चीगळ अशा वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जाते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ही भाजी प्रामुख्याने दिसून येते. परंतु या भाजीची खरी मजा उन्हाळ्यातच घेतली जाते. ही भाजी बारीक चुरगोळ्यासारखी दिसते. अगदी छोटी छोटी हिरवीगार पानं असलेल्या या भाजीला उन्हाळ्यामध्ये विशेष मागणी असते. ही शेतामध्ये स्वयं वाढणारी रानभाजी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा मिळावा म्हणून ही भाजी खास करून बनविल्या जाते. या भाजीचा झुणका अतिशय चविष्ट बनतो. भाकरी, चपाती यासोबत चिवळीच्या भाजीचा झुणका कांदा, हिरवी मिरची कैरी टाकून केलेला खास झुणका शहरासह ग्रामीण भागात मोठ्या आवडीने घरोघरी केल्या जातो. त्या झुणक्याची मजाच काही और आहे. त्यामुळे या भाजीची मागणी सुद्धा अलीकडे वाढली आहे.
चिवळीची भाजी रक्त शुद्ध करणारी, शरीरातील उष्णता कमी करणारी व इतर व्याधीवर गुणकारी असल्याचे जुनी जेष्ठ मंडळी सांगतात. शेतात सातत्याने वापरला जाणार्या रासायनिक फवार्यामुळे ही अतिशय गुणकारी असलेली भाजी नामशेष होऊ नये, ही रानभाजी टिकवणे अतिशय महत्त्वाचे आहे. विदर्भातील खाद्य संस्कृतीतील ही रानभाजी नष्ट होऊ नये म्हणून कृषी विभाग आणि शेतकर्यांनी काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. या रानभाजीला राज्यभरात ओळख प्राप्त करून दिल्यास भविष्यात उन्हाळ्याच्या दिवसात शेतकर्यांचे प्रमुख पीक म्हणून भाजीला महत्त्व प्राप्त होईल आणि शेतकर्याला आर्थिक मदत होईल.
शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरू शकते
उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याची आवक कमी असते. चिवळीची भाजी शेतकर्यांना उत्पन्न देऊ शकते. कमी कालावधीत कमी खर्चात येणारे हे पीक आहे. अडचणीच्या काळात हे पीक आर्थिक आधार ठरू शकते. या रानभाजीला शासनाच्या कृषी विभागाने राज्यस्तरावर विशेष महत्त्व प्राप्त करून द्यावे.
-शुभंम निमकाळे
शेतकरी, भंडाराज ता. अंजनगाव सुर्जी