तिवसा,
elgar-against-online-drug-sales : देशभरात ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या बेकायदेशीर प्रकारांविरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारच्या २८ ऑगस्ट २०१८ तसेच कोविड काळातील २६ मार्च २०२० या अधिसूचना मागे घेण्याच्या मागणीसाठी संघटनेने बुधवार, २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे.
बंदला महाराष्ट्र राज्यासह अमरावती जिल्हा आणि तिवसा तालुक्यातील औषधी विक्रेत्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, तालुक्यातील सर्व औषध दुकाने त्या दिवशी पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. शासन व प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षपूर्ण व नकारात्मक भूमिकेचा निषेध म्हणून हा बंद पाळण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
//ऑनलाईन औषध विक्रीवर आक्षेप का?
संघटनेच्या मते, इंटरनेट फार्मसी व ई-पोर्टल्सच्या माध्यमातून होत असलेली औषध विक्री ही अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने होत आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर खेळ होण्याची शक्यता आहे. बनावट व निकृष्ट औषधांचा धोका, स्थानिक औषध विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान अशा गंभीर बाबी निर्माण होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
तिवसा तालुका औषधी विक्रेता संघटनेने या बंद संदर्भात तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन पूर्वसूचना दिली आहे. जिल्हाध्यक्ष सौरभ मालानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, बंद शांततापूर्ण पद्धतीने पार पडणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. बंदच्या काळात कोणत्याही रुग्णाला अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, सचिव व अन्य पदाधिकारी आवश्यक त्या पातळीवर सहकार्य करतील, अशी माहिती संघटनेने दिली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष रणजीत मोझरीकर, अरुण चांडक, गजानन कडू, छगन राऊत, चंद्रशेखर वाट, अतुल देशमुख, मनोज बेलसरे, संजय हांडे, विशाल खोपे, रजत काळे, आदर्श जोशी, शाहरुख शहा, अनुराग भुतडा, कमल किशोर राठी, कृष्णा नायसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.