शेतकर्‍यांच्या खिशावर सरकारचा घाला

- खतांच्या किमतीत प्रचंड वाढ

    दिनांक :06-May-2026
Total Views |
गोंदिया, 
increase-in-fertilizer-prices : खतांच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून, प्रति गोणी तब्बल २५ ते ३७५ रुपयांपर्यंत वाढ झाल्याने सर्व साधारण शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ९ मेपासून लागू होणार्‍या नव्या दरांनी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांच्या खिशावर थेट घाव घातला आहे.
 
 

KJK 
 
 
 
गेल्या काही वर्षांत वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी त्रस्त असताना, आता खतांच्या दरवाढीने त्यांची अडचण आणखी तीव्र झाली आहे. युरिया, डीएपी, १०:२६:२६, २०:२०:०:१३ यांसारख्या प्रमुख खतांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही खतांमध्ये ३०० रुपयांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमतीत वाढ, आयातीवरील खर्च, लॉजिस्टिक खर्च आणि अनुदान वितरणातील विलंब ही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. मात्र, या सर्वांचा फटका थेट शेतकर्‍यांनाच बसत आहे. विशेष म्हणजे, रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकर्‍यांच्या प्रति एकर उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असून पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा वाढण्याची भीती निर्माण झाली असताना शेती तोट्यात जाण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
 
 
अनुदान झाले गायब...
 
 
खतांवरील अनुदान वेळेत न मिळाल्यानेच दरवाढ झाली, असा आरोप शेतकरी करत आहेत. अनुदानाची घोषणा कागदावरच राहते, प्रत्यक्षात फायदा होत नाही,अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहेत.
 
 
घर चालवायचं, शेती करायची आणि आता खतांसाठी एवढे पैसे द्यायचे सरकारने आमच्यासाठी नेमकं काय केलं? महिलांवर दुहेरी ओझं पडलं आहे. शेतीत काम करायचं आणि खर्चही पेलायचा.
- सत्यशिला पारधी, शेतकरी, सेजगाव
 
 
आधीच पिकांना योग्य भाव मिळत नाही. त्यात खतांच्या दरवाढीने कंबर मोडली. उत्पादन खर्च वाढला तर शेती करायची कशी? सरकारने तात्काळ हस्तक्षेप केला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरेल.
- रामदास पटले, शेतकरी, निलज