मुंबई
Mumbai food poisoning case शहरातील पायधुनी परिसरात डोकडिया कुटुंबातील चार जणांचा अकस्मात मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. डोकडिया कुटुंबातील एक पुरुष, एक महिला आणि त्यांच्या दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून, प्राथमिक माहितीनुसार अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेनुसार, कुटुंबाने रात्री उशिरा बिर्याणीचे जेवण केले होते. त्यानंतर मध्यरात्री त्यांनी कलिंगड खाल्ले. काही तासांतच सर्व सदस्यांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेण्यात आले, मात्र परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास वेगाने Mumbai food poisoning case सुरू असून जेजे रुग्णालयात डेथ ऑडिट सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही फॉरेन्सिक अहवालांमध्ये तीव्र विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात आला असून अन्नामध्ये ‘मॉर्फिन’सारख्या विषारी घटकांचा समावेश असल्याचा अंदाजही तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) प्राथमिक तपासात कलिंगडामध्ये कोणतीही भेसळ आढळून आलेली नाही. त्यामुळे आता पोलिसांचा तपास विषप्रयोग किंवा अन्य संभाव्य कारणांकडे वळला आहे. या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, विषशास्त्र अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, या रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात सुमारे साडेपाच तासांचा विलंब झाला. या काळाला वैद्यकीय भाषेत ‘गोल्डन अवर’ म्हटले जाते आणि तो गमावल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एका साध्या कौटुंबिक रात्रीच्या जेवणानंतर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पायधुनी परिसरात तसेच संपूर्ण मुंबईत हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.