गोंदिया जिल्ह्याला अवकाळीचा फटका ; १२९ गावे बाधित

- १३८९.८० हेक्टरातील धान, आंबा, मका व भाजीपाला पिकाचे नुकसान

    दिनांक :06-May-2026
Total Views |
गोंदिया, 
unseasonal-rain : गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा जिल्ह्यातील १३८९.८० हेक्टर कृषि क्षेत्राला फटका बसला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी झालेल्या वादळी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे धान पिकासह आंबा, भाजीपाला व मका पिकाचे नुकसान झाल्याचे संबंधित विभागाकडून नजरअंदाजित अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
 
 
GON
 
 
 
दिवसभर उन्ह तापल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ढगांनी गर्दी करत मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरुवात झाली. विशेषतः गोंदियासह गोरेगाव, तिरोडा, देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यात या वादळी पावसाने चांगलाच कहर केला. त्यात गोरेगाव व आमगाव तालुक्यात गारांचा पाऊस झाला. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने व विद्युत तारा तुटल्याने रात्री उशिरापर्यंत अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विशेष म्हणजे, या पावसामुळे जिल्ह्यातील १२९ गावे बाधित झाली असून २ हजार ९०८ शेतकर्‍यांच्या १३८९.८० हेक्टर शेतातील धान पिकासह मका, आंबा व भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
 
 
विशेषता कापणीला आलेला धान जमीदोस्त झाला आहे. यात सर्वाधिक नुकसानीची नोंद गोरेगाव तालुक्यात करण्यात आली असून गोरेगाव तालुक्यातील ५८ गावे या वादळी पावसामुळे बाधित झाली असून १०९४.९० हेक्टर शेतीला फटका बसला. गोंदिया तालुक्यातील १९ बाधित गावातील १०८ हेक्टर क्षेत्राला या पावसाचा फटका बसला, तिरोडा तालुक्यातील ५ गावातील ४.३० हेक्टर क्षेत्रातील धान व आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. तर देवरी तालुक्यातील ६ गावे बाधित झाली असताना ६.६० हेक्टरमधील आंबा व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर आमगाव तालुक्यातील १८ गावांना या अवकाळी पावसाने झोडपून काढत ९३.३० हेक्टर शेती बाधित झाली तर सालेकसा तालुक्यातील २३ बाधित गावातील ८२.७० हेक्टर मधील भात, आंबा व मका पिक जमीदोस्त झाल्याचा नजरअंदाज अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.
 
 
दुसर्‍या दिवशीही बरसल्या धारा
 
 
मंगळवारी पावसाने झोडपून काढल्यानंतर आज, बुधवारी दुसर्‍या दिवशीही दिवसभर उन्ह तापल्यानंतर ४ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ दिसून आली.
 
 
लग्न समारंभाचे तीनतेरा...
 
 
दिवसभर उन्ह तापत असताना ऐन सायंकाळच्या सुमारास पावसाच्या सरी बरसत असल्याने रात्रीच्या सुमारास आयोजित लग्न समारंभाचे तीनतेरा वाजत आहेत. यात विशेषतः वधू पित्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असून वर्‍हाड्यांचीही फजिती होत आहे.