गोंदिया जिल्ह्यात १८८ धान व मका खरेदी केंद्रांना मंजुरी

- ४२ हजारांहून अधिक धान उत्पादकांची नोंद - मका नोंदणीही ३ हजारपार

    दिनांक :06-May-2026
Total Views |
गोंदिया, 
paddy-maize-procurement-centers : महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्हा पणन कार्यालयामार्फत रब्बी पणन हंगाम २०२५-२६ साठी धान व मका खरेदीकरिता शेतकरी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून मागील महिन्यात ४ ते ३० एप्रिल या कालावधीत मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून धान उत्पादकांची संख्या ४२,१४२ पर्यंत पोहोचली आहे. त्यात मका उत्पादक शेतकर्‍यांची संख्या चांगली असून ३ हजाराच्या वर शेतकर्‍यांनी नोंदणी पूर्ण केली आहे.
 
 
 
GOND
 
 
 
जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धान खरेदीसाठी जिल्ह्यात एकूण १८८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी १८७ केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यापैकी १८५ केंद्रांवर प्रत्यक्ष नोंदणीची कार्यवाही सुरू आहे. २९ एप्रिलपर्यंत १९,८४६ शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती, तर ३० एप्रिल रोजी एकाच दिवशी २२,२९६ शेतकर्‍यांनी नोंदणी केल्याने एकूण आकडा ४२,१४२ वर गेला आहे. मका खरेदीबाबतही नोंदणीला समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात १७ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून सर्व १७ केंद्रांवर नोंदणी सुरू आहे. मका उत्पादक शेतकर्‍यांची एकूण नोंदणी ३,१०१ इतकी झाली आहे. यामध्ये २९ एप्रिलपर्यंत २,०७३ शेतकर्‍यांची नोंदणी झाली होती, तर ३० एप्रिल रोजी १,०२८ शेतकर्‍यांनी नोंदणी केली. जिल्हा पणन अधिकारी यांनी शेतकर्‍यांना वेळेत नोंदणी करून हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. खरेदी केंद्रांवरील सुविधा, पारदर्शकता आणि वेगवान प्रक्रिया यामुळे शेतकर्‍यांचा विश्वास वाढत असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.