तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
devendra-fadnavis : तेलंगटाकळी येथील ‘हेल्थ अँड वेलनेस उपकेंद्रा’ची स्थिती शासनाच्या ‘उद्घाटन संस्कृती’वरच प्रश्नचिन्ह उभा करणारी ठरली आहे. 13 सप्टेंबर 2025 ला मुख्यमंत्री देवेंद्र फदणवीस यांच्या हस्ते मोठ्या गाजावाजात उद्घाटन झाल्यानंतरही ही इमारत आजपर्यंत अपूर्णच असून, बंद अवस्थेत धूळ खात पडली आहे. उद्घाटन करून जनतेची दिशाभूल केल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे.
हा प्रकार आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या मतदारसंघात घडत असल्याने अधिकच गंभीर मानला जात आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेली ही इमारत यवतमाळ पांढरकवडा या अतिवर्दळीच्या मार्गावर असून येथे वारंवार अपघात होतात. अपघातग्रस्तांना तत्काळ प्रथमोपचार मिळावा, या उद्देशाने उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात सुरूच न झाल्याने लोकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता सायेश घंटेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरुवातीला थातुरमातुर उत्तरे दिली. पुढे त्यांनी उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला आता लवकरच घटनास्थळी घेऊन येणार असल्याचे सांगितले.
मात्र, वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या मार्गावर सतत होणाèया अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा तातडीने सुरू होणे गरजेचे असताना, अधिकाèयांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या निरपराध नागरिकाचा जीव जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा घटनेत जीवहानी झाल्यास संबंधित बांधकाम अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सुमारे आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करूनही प्रत्यक्षात सुविधा सुरू न होणे, हा केवळ दिखावा की प्रशासनाचा बेजबाबदारपणा, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत असून या प्रकरणात जबाबदार अधिकाèयांवर तातडीने कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
इमारत अद्याप कामाची नाही
इमारतीत मूलभूत सुविधांचाच अभाव आहे. रस्ता नाही, फाटक अपूर्ण, पाईपलाइन फुटलेली, शौचालय व बाथरूम अपूर्ण, वीजजोडणी अपूर्ण, छतावर पाणी साचते, खिडक्यांमधून पावसाचे पाणी आत येते. अशा धोकादायक स्थितीत ही इमारत वापरणे अशक्य आहे. अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. दोनवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी कळवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कामे पूर्ण केल्याशिवाय इमारत हस्तांतरण होऊ शकत नाही.
डॉ. संजय मडावी,
तालुका वैद्यकीय अधिकारी, पांढरकवडा