कारंजा
Karanja Lad अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा वाशीम पथकाने ४ मे रोजी कारंजा शहरात आयपीएल क्रिकेट क्रिकेट सट्ट्यावर कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत मोबाईल, टॅब, मोटारसायकल व रोख रक्कम असा एकूण १ लाख ३३ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी कारंजा शहरातील द्वारका कॉलनी, सिंधी कॅम्प परिसरात काही इसम लखनौ विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यावर सट्टा लावून पैशांची हारजीत करत असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी विशेष पथक तयार करून कारंजा येथे रवाना केले. पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता एका बंद खोलीत सट्टा सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत सोपान अशोक लोणागरे (वय ३२, रा. वार्ड क्र. १, पिंजर, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) याच्यासह आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. कारवाई दरम्यान ६ मोबाईल फोन, १ टॅब, १ मोटारसायकल व रोख रक्कम असा एकूण १,३३,४१० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस स्टेशन Karanja Lad कारंजा शहर येथे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपाससुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलिस उपनिरीक्षक शेखर मास्कर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.