कारंजा लाड
Karanja Lad tribal protest तालुयातील खेर्डा जिरापुरे येथे १४ वर्षीय आदिवासी (गोंड) अल्पवयीन मुलीवर झालेल्या छेडछाडीच्या गंभीर घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित प्रकरणात आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे.
पीडित मुलीने कारंजा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या जबानीनुसार, गावातील मनीष विष्णुपंत गुल्लाने (वय ५५ ) याने तिच्याशी अयोग्य वर्तन करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तसेच तिला धमकावल्याचे समोर आले आहे. मुलगी इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत असून तिचे आई-वडील मजुरीचे काम करतात. आरोपीकडे तिच्या कुटुंबीयांची कामानिमित्त ये-जा असल्याने ओळखीचा फायदा घेत हा प्रकार घडल्याचे स्पष्ट होत आहे. माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी आरोपीने मुलीशी अयोग्य संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी मुलगी घाबरल्यामुळे तिने ही बाब घरी सांगितली नव्हती. मात्र २ मे रोजी सकाळी ती घरी एकटी असताना आरोपी घरात शिरून दार बंद करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने धाडसाने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर आरोपीने तिला पैसे देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न केला व जीव मारण्याची धमकी दिल्याचेही उघड झाले आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत मुलीने प्रथम आपल्या आत्याला व नंतर आई-वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कारंजा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, न्याय मिळवण्यासाठी नागरिक व विविध सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे राज्य प्रभारी अविनाश पंधरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. जर आरोपीवर त्वरित कारवाई झाली नाही, तर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला.
यावेळी सामाजिक प्रमोद देवळे, गजानन वरगट, भीमराव भलावी, दत्ता चिकराम, विनोद एडापाटे, दिनेश मसराम, सागर सेडमाके, ऋषभ कुमरे, गोलू वाधवे, शालिग्राम मरसकोले, निखिल पेंदाम, कार्तिक तुमडाम, अंकुश तुमडाम, गजानन सयाम, गणेश शिडाम, संतोष चौधरी, रघुनाथ सिडाम आदी उपस्थित होते.