पुणे,
nasrapur-case : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका 65 वर्षीय व्यक्तीवर चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात आरोपीने दिलेल्या जबाबाने तपास यंत्रणेलाही धक्का बसला आहे. “घटनेच्या दिवशी मी नशेत होतो,” असे सांगत आरोपीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांना हा दावा संशयास्पद वाटत असून सखोल चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात पीडित चिमुकली मामाच्या गावाला सुट्टीसाठी आली होती. आरोपीने तिला “वासरं दाखवतो” असे सांगून गोठ्यात नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि पुरावा लपवण्यासाठी मृतदेह लपवण्याचाही प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. काही वेळानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
या घटनेनंतर गावात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, आरोपीच्या कुटुंबीयांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून त्यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.