कोलकाता,
Official moment for BJP's victory in Bengal पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर नव्या सरकार स्थापनेची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. भारतीय जनता पक्षाने बहुमतासह मोठा विजय मिळवत सत्तेच्या दिशेने पाऊल टाकले असून, निवडणूक आयोगाने यासंदर्भात अधिसूचना जाहीर केल्यामुळे पुढील हालचालींना अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. ही अधिसूचना राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याने नव्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. ४ मे रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार, भारतीय जनता पक्षाने २०७ जागांवर विजय मिळवला, तर दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. दरम्यान, ८ मे रोजी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याच दिवशी पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शाह कोलकात्यात येऊ शकतात, अशीही माहिती समोर येत आहे.

सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ७ मे रोजी संपत असल्यामुळे नवीन सरकार स्थापन करण्याची घाई सुरू झाली आहे. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी निकालांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पराभव मान्य करण्यास नकार देत आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या सरकारचा शपथविधी ९ मे रोजी होण्याची शक्यता आहे. हा दिवस गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचा असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकते. यापूर्वीही पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात संकेत दिले होते. दरम्यान, पश्चिम बंगालसह आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी या राज्यांमध्येही नवीन विधानसभा स्थापनेसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे संबंधित राज्यांतील विजयी पक्षांना नव्या सरकार स्थापनेसाठी अधिकृतरीत्या पुढे येण्याचा मार्ग खुला झाला आहे. आगामी काही दिवसांत या सर्व राज्यांतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.