पलाश मुच्छल अडकला कायद्याच्या कचाट्यात!

    दिनांक :06-May-2026
Total Views |
सांगली,
Palash Muchhal news बॉलिवूडमधील संगीतकार आणि चित्रपट निर्माते पलाश मुच्छल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वैयक्तिक आयुष्यातील चर्चेनंतर आता त्यांच्यावर सांगलीमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिच्यासोबत ठरलेले लग्न मोडल्यापासून मुच्छल सातत्याने चर्चेत आहेत.
  

palas 
 
महाराष्ट्रातील सांगली येथे त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार विज्ञान माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका वादाच्या वेळी मुच्छल यांनी अपमानास्पद आणि जातिवाचक शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना सांगली-आष्टा मार्गावरील टोल नाक्याजवळ घडल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी या प्रकरणात संबंधित कायद्यांच्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
 
 
या प्रकरणामागे आर्थिक व्यवहाराचा मुद्दाही असल्याचे समोर आले आहे. विज्ञान माने यांच्या म्हणण्यानुसार, एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी मुच्छल यांनी त्यांच्याकडून सुमारे पंचवीस लाख रुपये घेतले होते. ठरलेल्या कालावधीत चित्रपट पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र बराच काळ उलटूनही काम पूर्ण झाले नाही. पैसे परत मागितल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारदाराने माध्यमांशी बोलताना, पैसे परत मिळवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याचे सांगितले. उलटपक्षी वाद वाढत गेला आणि त्यावेळी अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.