पंढरपूर
Radha Patil तालुक्यातील सुस्ते गावात यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नृत्य कार्यक्रमादरम्यान अचानक गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दोन तरुणांमधील किरकोळ वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त नृत्यांगना राधा पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी परिसरातील मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रम रंगात आला असतानाच काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद चिघळत गेला आणि काही क्षणांतच त्याचे रूपांतर तुफानी हाणामारीत झाले.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डान्स पाहताना झालेल्या वादातून काही तरुणांनी एका युवकाला बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली आणि उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच आयोजकांनी कार्यक्रम तात्काळ थांबवला.
विशेष म्हणजे, याच यात्रेत Radha Patil दोन दिवसांपूर्वी नृत्यांगना गौतमी पाटील हिचाही कार्यक्रम पार पडला होता. त्या कार्यक्रमालाही मोठी गर्दी झाली होती, मात्र तो कार्यक्रम शांततेत पार पडला होता. सुस्ते गावात दोन वेगवेगळ्या राजकीय गटांकडून स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका गटाने गौतमी पाटील तर दुसऱ्या गटाने राधा पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये असलेली स्पर्धा प्रेक्षकांमध्येही जाणवत असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात काही तरुण एका युवकाला मारहाण करताना दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.