देवळी,
ramdas tadas आजचे जग स्पर्धात्मक आहे. स्पर्धात्मक युगात स्पर्धक बनले पाहिजे. त्यादृष्टीने आपले कौशल्य सातत्याने वाढवण्याची गरज आहे. जिद्द, मेहनत व ध्येय प्राप्तीकरिता समर्पणच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस यांनी केले.
स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य प्राप्त गुणवंतांचा अभिनंदन सोहळ्यात ते एनसीसीच्या सभागृहात केले. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे, एनसीसी अधिकारी तथा ज्येष्ठ प्राध्यापक कॅप्टन मोहन गुजरकर, पालक प्रतिनिधी संजय पारिसे, न प नगरसेवक रवींद्र कारोटकर, नगरसेवक उमेश कामडी, पुष्पा पारिसे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सोनारे म्हणाल्या की, जीवनात यश मिळवायचे असेल तर सातत्यपूर्ण अभ्यास व सर्वांगीण विकासाकरिता विविध उपक्रम आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात राबविण्यात येत असणारे उपक्रम प्रशंसनीय आहे.
कॅप्टन मोहन गुजरकर म्हणाले की, आम्ही महाविद्यालयीन अभ्यासक्रमासोबत अभ्यास पूरक उपक्रम, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना, रोव्हर स्काऊट, रेंजर गाईड, राष्ट्रीय हरित सेना व इंग्रजी विषयात संभाषण कला यासारख्या उपक्रमात विद्यार्थ्यांना वर्षभर सहभागी करून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न करीत असतो.ramdas tadas केवळ पुस्तकी ज्ञानावर भर नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो असे ते म्हणाले.
याप्रसंगी एनसीसी छात्र सैनिक साक्षी पारिसे, श्रद्धा आगलावे, भाग्यश्री वलीवकर, निशा कांबळे, कुंदन कावडे, चैतन्या तलांडे, यश साटोणे, शुभम परिसे, पूर्वा बिजवार, लक्ष्मी कावडे, प्राप्ती मांढरे, गायत्री पदीले, शितल आष्टकार, पायल बाग व श्रुती कोल्हे या विद्यार्थ्यांना माजी खासदार रामदास तडस यांनी आपल्या संस्थेतर्फे प्रत्येकी रोख बक्षीस दिले. संचालन आरती मरघडे यांनी तर आभार प्रा. जगदीश यावले यांनी मानले.