रेती माफियांवर पोलिसांचा मोठा दणका

८४.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :06-May-2026
Total Views |
तिवसा, 
sand-mafia : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकी विरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा दणका दिला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून तीन ट्रक व एक ट्रॅक्टरसह तब्बल ८४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
 
amt
 
पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याच अनुषंगाने ५ मे रोजी दोन पथकांनी तिवसा व शेंदूरजना घाट परिसरात गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेतीची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत प्रथम तिवसा हद्दीत टाटा एसके १६१३ (एमएच २७ बीएक्स ००३९) ट्रक अडवून त्यामधील ५ ब्रास रेतीसह वाहन जप्त केले व फुलचंद मौजीलाल हरसुले (रा. परसापूर, ता. अचलपूर) व निलेश गुलाबराव गुडदे (रा. अमरावती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात केला. या प्रकरणातील मुद्देमालाची किंमत सुमारे १० लाख ३५ हजार रुपये आहे, त्यानंतर सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच ३२ एएस ५२१६) अडवून त्यामधील १ ब्रास रेती जप्त करण्यात आली व अभिषेक प्रवीण मुसळे (वय २२) व अजय देविदास लोखंडे (वय ५६, दोन्ही रा. आष्टी, जि. वर्धा) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
 
 
मुद्देमाल सुमारे ७ लाख ७ हजार रुपये आहे. पुढे शेंदूरजना घाट परिसरात कारवाई करत टाटा कंपनीचा टिप्पर (एमएच २७ बीएक्स ५२५८) पकडून त्यामधील ६ ब्रास रेती व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले व अरविंद भीमराव अंबाडकर (रा. लोणी बेनोडा), क्रिश वासुदेव बडोदे (रा. मिर्जापूर, ता. वरुड) व किशोर बेलसरे (रा. धनोडी, ता. वरुड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून मुद्देमालाची किंमत २५ लाख ८० हजार रुपये आहे. तसेच दुसरा टिप्पर (एमएच ४० डीसी ३९९९) अडवून त्यामधील ७ ब्रास रेती व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. शेख जमीर शेख इसा (रा. शेंदूरजना घाट), अल्ताफ शेख बशीर (रा. पुसला) व सय्यद असरार उर्फ बबलू सय्यद अल्ताफ (रा. नरखेड, ता. वरुड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील मुद्देमाल ४० लाख ९० हजार रुपये आहे, अशा प्रकारे एकूण ४ वाहनांवर कारवाई करत १९ ब्रास रेतीसह एकूण ८४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई एपीआय अमोल मुडे, पोलिस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पोलिस अमलदार युवराज मानमोठे, रवींद्र वर्‍हाडे, सुनील महात्मे, चेतन दुबे, स्वप्नील तवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक प्रज्वल राऊत व नवीन शहा यांनी केली.