आता ‘वंदे मातरम्’चा अपमान महागात पडणार!

    दिनांक :06-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Punishment for insult Vande Mataram नवी दिल्ली येथे केंद्र सरकारने देशभक्तीशी संबंधित प्रतीकांच्या सन्मानासाठी मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई होणार असून त्यासाठी विद्यमान कायद्यात महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आली आहे. ही दुरुस्ती राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ मध्ये करण्यात आली असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली.
 
 

vande mataram 
शिक्षेची तरतूद होणार
या निर्णयानुसार ‘वंदे मातरम्’ गाताना अडथळा निर्माण करणे, त्याचा अपमान करणे किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात त्याचा अवमान होईल असे वर्तन करणे आता गुन्हा मानले जाणार आहे. अशा कृत्यांसाठी दंड किंवा कारावास अशा शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. यापूर्वी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राज्यघटना यांचा अपमान केल्यास कठोर शिक्षा होत होती. आता त्याच धर्तीवर ‘वंदे मातरम्’लाही कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. गृह मंत्रालयाने यापूर्वी या गीताच्या सन्मानाबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, मात्र त्या केवळ सल्लागार स्वरूपाच्या होत्या. नव्या बदलानंतर या सूचनांना कायदेशीर बळ प्राप्त झाले आहे. अधिकृत कार्यक्रमांमध्ये संपूर्ण गीत सादर करणे अपेक्षित असून ज्या ठिकाणी राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही असतील, तिथे ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.