मुंबई,
Raja Shivaji at the box office छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित चित्रपटांना महाराष्ट्रात नेहमीच मोठा प्रतिसाद मिळत आला आहे. या परंपरेत अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच चित्रपटगृहांवर आपली पकड मजबूत केली असून कमाईच्या बाबतीतही प्रभावी कामगिरी केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तुफान प्रतिसाद मिळवत सुमारे ३३ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतरही प्रेक्षकांची गर्दी कायम राहिली आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाने देशभरात सुमारे ४.९० कोटी रुपयांची कमाई केली असून एकूण देशांतर्गत कमाई ४४ कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. जागतिक पातळीवर हा आकडा सुमारे ५२ कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

सुमारे शंभर कोटी रुपयांच्या खर्चातून तयार झालेल्या या चित्रपटात जेनेलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, फरदीन खान, सलमान खान आणि भाग्यश्री यांसारख्या कलाकारांचा सहभाग आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे सादरीकरण जिओ स्टुडिओने केले असून निर्मितीची धुरा ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी सांभाळली आहे. मराठी आवृत्तीच्याही कमाईकडे पाहिल्यास सुरुवातीपासूनच या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. पहिल्या काही दिवसांत सातत्याने चांगली कमाई करत हा चित्रपट पुढे सरकत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, मोठी कलाकार फळी आणि भव्य मांडणी यामुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत असून येत्या दिवसांतही त्याची घोडदौड सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.