छतावरील कुक्कुटपालनातून आंतरराष्ट्रीय सन्मानापर्यंत

रवींद्र मेटकर यांची यशोगाथा

    दिनांक :06-May-2026
Total Views |
अमरावती, 
ravindra-metkar : उच्च शिक्षणासाठी धावपळ, मनासारखी नोकरीचा पाठलाग तरीही नोकरी दूरच. मग काय, मिळेल तेथे नोकरी करण्याची मानसिकता आजच्या युवकांच्या स्वप्नांना भरकटत आहे. स्वतःचा उद्योग हे स्वप्न आणि ध्येय नसल्याचे आजचा सुशिक्षित तरुण हवालदिल असल्याचे वास्तव आहे. मात्र ज्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्यावर विश्वास ठेवत स्वतःचा व्यवसाय सुरु केला त्यांची यशोगाथा सातासमुद्रापलीकडे गाजली. असेच व्यक्तिमत्व म्हणजे, रवींद्र मेटकर! कृषी विज्ञान केंद्र घातखेडच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतीला कुक्कुटपालनाची जोड देत त्यांनी व्यवसायात भरारी घेतली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड येथे आयोजित वैश्विक आर्थिक परिषदेत नुकताच करण्यात आला.
 
 
amt
 
 
 
अमरावतीचे सुप्रसिद्ध पोल्ट्री उद्योजक रवींद्र माणिकराव मेटकर यांनी अत्यंत बेताच्या परिस्थितीत घराच्या छतावर सुरू केलेल्या कुक्कुटपालन व्यवसायातून मिळविलेले यश आज आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. १९८४ साली अत्यंत मर्यादित साधनसामग्री आणि भांडवलाच्या अभावात मेटकर यांनी आपल्या घराच्या छतावर कुक्कुटपालनाचा छोटासा प्रयोग सुरू केला. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी, आर्थिक संकटे आणि तांत्रिक मर्यादा असूनही त्यांनी चिकाटी सोडली नाही. अनुभवातून शिकत, नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला.
 
 
छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा व्यवसाय पुढे ब्रॉयलर कोंबडी पालन आणि अंडी उत्पादनाच्या मोठ्या उद्योगात परिवर्तित झाला. आधुनिक व्यवस्थापन, योग्य आहार पद्धती, रोगनियंत्रण आणि बाजारपेठेची अचूक जाण यामुळे त्यांनी पोल्ट्री क्षेत्रात अनेक कीर्तीमान प्रस्थापित केले. मेटकर यांच्या कार्याची दखल केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. विविध कृषी आणि पशुसंवर्धन संस्थांकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या यशामागे केवळ व्यवसायिक दृष्टिकोन नसून ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सामाजिक दृष्टिकोन ही तितकाच महत्त्वाचा आहे.
 
 
आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकरी आणि युवक पोल्ट्री व्यवसायात यशस्वी होत आहेत. लहान सुरुवात करा, पण मोठे स्वप्न पाहा हा त्यांचा जीवनमंत्र अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मेटकर यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, ऑक्सफर्ड येथे आयोजित वैश्विक आर्थिक परिषदेत त्यांचा गौरव झाला. ही अमरावतीसह संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब आहे.