विजयचा झंझावात अण्णाद्रमुकमध्ये बंडाची चाहूल!

    दिनांक :06-May-2026
Total Views |
चेन्नई
Rumours of rebellion in AIADMK तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्तासमीकरणांभोवती मोठी हालचाल सुरू झाली आहे. अभिनेता-राजकारणी थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला असला, तरी बहुमतापासून काही अंतरावर थांबावे लागले आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुक पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. पक्षातील अनेक आमदार टीव्हीकेला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पक्षातील मोठा गट लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आग्रह धरत असून, अन्यथा ३० पेक्षा अधिक आमदार पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य बंडाचे नेतृत्व सी. व्ही. षण्मुगम करत असल्याची चर्चा आहे.
 
 

AIADMK
 
दरम्यान, अण्णाद्रमुकच्या नव्याने निवडून आलेल्या आमदारांची बैठक चेन्नई येथे होणार होती, मात्र ती अचानक पुढे ढकलण्यात आली. पक्षातील काही नेत्यांचा कल असा आहे की, थलपती विजय यांच्या पक्षाला किमान एक वर्षासाठी बाहेरून पाठिंबा द्यावा. सध्या तामिळनाडू विधानसभेतील बहुमतासाठी ११८ जागांची गरज असताना टीव्हीकेकडे १०८ जागा आहेत, त्यामुळे सत्तास्थापनेसाठी सहकार्य अपरिहार्य ठरत आहे.दुसरीकडे द्रमुक आणि इतर घटक पक्षांमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचा झुकावही टीव्हीकेकडे असल्याचे बोलले जात असून, राहुल गांधी यांनी विजय यांना दूरध्वनीवरून दिलेल्या शुभेच्छांकडे संभाव्य राजकीय समीकरणांच्या संकेत म्हणून पाहिले जात आहे.