नवी दिल्ली,
Sanju Samson's entry into run race आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीत आता नव्या रंगतदार घडामोडी घडताना दिसत आहेत. मंगळवारी झालेल्या सामन्यात संजू सॅमसनने दमदार फलंदाजी करत या स्पर्धेत स्वतःची मजबूत उपस्थिती दाखवून दिली. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेल्या आक्रमक खेळीमुळे तो आता अव्वल धावसंख्येच्या शर्यतीत ठामपणे दाखल झाला आहे.या हंगामात ४०० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संजू सॅमसनने स्थान मिळवले असून तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत दहा सामन्यांत ४०२ धावा जमवल्या आहेत. विशेष म्हणजे अव्वल पाच फलंदाजांमध्ये त्याची सरासरी सर्वाधिक असून त्याची सातत्यपूर्ण कामगिरी लक्षवेधी ठरत आहे.
दरम्यान, दिल्लीचा फलंदाज केएल राहुल पुन्हा एकदा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याने फार मोठी खेळी केली नसली तरी त्याच्या धावसंख्येत झालेली वाढ त्याला पुन्हा पहिल्या क्रमांकावर घेऊन गेली. दहा सामन्यांत त्याने ४४५ धावा केल्या असून तो सध्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी अव्वल स्थानावर असलेला अभिषेक शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून त्याच्या खात्यात ४४० धावा आहेत. त्यामुळे अव्वल स्थानासाठी दोघांमध्ये चुरस कायम आहे.
सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने ४२५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर वैभव सूर्यवंशी चौथ्या स्थानावर असून त्याच्या नावावर ४०४ धावा आहेत. या सगळ्यांमध्ये संजू सॅमसनने पाचव्या स्थानावर झेप घेत स्पर्धेत नवे समीकरण तयार केले आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने केवळ ५२ चेंडूंमध्ये ८७ धावांची तुफानी खेळी साकारली. त्याच्या या डावात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. तो शतकाच्या उंबरठ्यावर असताना बाद झाला, मात्र त्याच्या फलंदाजीमुळे संघाला भक्कम पाया मिळाला. या हंगामात ४०० धावांचा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजांच्या गटात स्थान मिळवत संजूने आपल्या उत्कृष्ट फॉर्मची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.