वर्धा,
Shambhutirth memorial Wardha गांधीनगर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला केंद्रस्थानी ठेवून वर्धेच्या इतिहासात अभिमानाचा नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘शंभुतीर्थ’ या भव्य-दिव्य आणि अत्याधुनिक स्मारकाच्या उभारणीसंदर्भात छत्रपती संभाजी महाराज समितीच्या वतीने नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी नगरसेवक सोहनसिंग ठाकूर, माजी नगरसेवक सोनल ठाकरे व डॉ. आशिष ठाकरे उपस्थित होते. विशेष म्हणजे, सोनल ठाकरे आणि डॉ. आशिष ठाकरे यांनी शंभुतीर्थ प्रकल्पाची सविस्तर व दृष्टीकोन स्पष्ट करणारी संकल्पना प्रभावीपणे मांडली.समितीच्या मते, शंभुतीर्थ हा प्रकल्प केवळ स्मारक उभारणीपुरता मर्यादित नसून छत्रपती संभाजी महाराजांचा तेजस्वी वारसा, अद्वितीय पराक्रम, अतुलनीय त्याग आणि अखंड राष्ट्रनिष्ठा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे एक प्रेरणास्थळ ठरणार आहे. येथे इतिहास फत वाचला किंवा ऐकला जाणार नाही, तर तो प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. ३-डी अॅनिमेशन, व्हीएफएस, ध्वनी-प्रकाश प्रभाव आणि होलोग्राफिक सादरीकरणाच्या माध्यमातून महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग जिवंत स्वरूपात उभे राहतील.
स्मारकाच्या आराखड्यात मराठा स्थापत्यशैलीतील भव्य प्रवेशद्वार, इतिहासाचे सजीव दर्शन घडविणारी दालने, मध्यवर्ती ठिकाणी महाराजांचा दिव्य आणि भव्य पुतळा तसेच आकर्षक प्रकाशध्वनी शो यांचा समावेश असेल. यासोबतच युवकांसाठी अत्याधुनिक डिजिटल वाचनालय, स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास केंद्र, मुलांसाठी संस्कारक्षम शैक्षणिक उपक्रम आणि विविध इंटरअॅटिव्ह सुविधा उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. तसेच यूआर कोड आधारित माहिती प्रणाली, शंभुतीर्थ डिजिटल अॅप, व्हर्च्युअल टूर, ऑडिओ कथा आणि इतिहास कार्यशाळा यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे हे ठिकाण आधुनिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक सोनल ठाकरे यांनी यावेळी दिली.
या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रमाच्या यशासाठी सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.