न्यायालय-एसडीएम कार्यालय उडवण्याची धमकी!

    दिनांक :06-May-2026
Total Views |
शिमला,
shimla-threat : हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहडू परिसरातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय आणि न्यायालय उडवण्याची धमकी देणारे पोस्टर आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
 

SHIMLA 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, भराडी रस्त्यावर लावलेल्या पोस्टरमध्ये हिंदी आणि उर्दू भाषेत धमकीचा मजकूर लिहिलेला होता. त्यामध्ये स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता आणि “दिल्लीपर्यंत आवाज जाईल” असा उल्लेख असल्याने प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे.
 
ही माहिती समोर येताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत न्यायालय आणि उपविभागीय कार्यालय परिसर रिकामा केला. संपूर्ण परिसर सील करून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
स्फोटके शोधणारे पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची सखोल तपासणी करण्यात आली आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
 
पोस्टर जप्त करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामागे कोणती व्यक्ती किंवा संघटना आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर सेल आणि गुप्तचर यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
 
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.