जालंधर,
Two blasts in Punjab पंजाबमध्ये रात्रीच्या वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोटाच्या घटना घडल्याने संपूर्ण राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या दोन्ही घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तपास यंत्रणांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. पहिली घटना जालंधर शहरात रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास घडली. येथे सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका स्कूटरमध्ये अचानक स्फोट झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जालंधरमधील या घटनेनंतर काही तासांतच दुसरी घटना अमृतसर शहरातील खासा परिसरात घडली. रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास लष्करी छावणीच्या जवळ स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा आवाज दूरपर्यंत जाणवला असून स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की छावणीच्या परिसरातील भिंतींनाही हादरे बसले.
या दोन्ही घटनांची माहिती मिळताच लष्कर आणि पंजाब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसर तातडीने सील करण्यात आला असून फॉरेन्सिक पथकांकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. स्फोटांचे नेमके कारण आणि दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात दोन्ही घटनांमध्ये कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याचे निश्चित झालेले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र या स्फोटांच्या स्वरूपामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून संपूर्ण राज्यात गस्त आणि निगराणी वाढवण्यात आली आहे.