टेक्सास,
Two dead in shooting in Texas अमेरिकेतील टेक्सास राज्यात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना डॅलस शहराजवळील कॅरोलटन परिसरात घडली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यापारी संकुलाजवळ काही व्यक्ती एकत्र आलेल्या असताना अचानक गोळीबार झाला. या घटनेत पाच जणांना गोळ्या लागल्या, त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही घटना अचानक घडलेली नसून संबंधित व्यक्तींमध्ये आधीपासून ओळख असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यात काही प्रकारचे वैयक्तिक किंवा व्यावसायिक वाद असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका बैठकीच्या निमित्ताने ते एकत्र आले असावेत, अशीही माहिती समोर येत आहे, मात्र या भेटीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळ डॅलसपासून सुमारे बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅरोलटनमधील कोरियन वस्तीच्या भागात आहे. घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून ते स्थानिक पोलिसांसोबत मिळून सखोल चौकशी करत आहेत.