वास्तव नाकारून चालणार नाही

    दिनांक :06-May-2026
Total Views |
पुणे/ कोलकाता
Ujjwal Nikam पश्चिम बंगालमधील अलीकडील विधानसभा निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील सत्तांतर प्रक्रियेत संविधानिक मार्गाचा अवलंब व्हावा आणि परिस्थिती बिघडून राष्ट्रपती राजवटीपर्यंत जाऊ नये, यासाठी राज्यपालांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे त्यांनी सुचविले आहे.
 

Ujjwal Nikam 
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यामुळे तब्बल १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र पराभव स्वीकारण्यास नकार देत निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी निकाल मान्य नसल्याचे सांगत राजीनामा देण्यासही नकार दिला आहे.या पार्श्वभूमीवर निकम यांनी स्पष्ट केले की, भारतीय राज्यघटनेनुसार बहुमत गमावलेल्या सरकारने सत्तेत राहणे योग्य नाही. अशा परिस्थितीत राज्यपालांकडे हस्तक्षेप करण्याचा अधिकार असून ते बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात किंवा नव्या बहुमत पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. राज्यात घटनात्मक संकट निर्माण होऊ नये, यासाठी योग्य वेळी निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, तज्ज्ञांच्या Ujjwal Nikam मतेही निवडणूक निकाल लागल्यानंतर विद्यमान सरकारने पदत्याग करून नव्या सरकारच्या स्थापनेस मार्ग मोकळा करून देणे ही घटनात्मक प्रक्रिया आहे. राज्यपालांची भूमिका या टप्प्यावर निर्णायक ठरते, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर आणि विरोधकांवर गंभीर आरोप करत निकालावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सुमारे १०० हून अधिक जागांवर गैरप्रकार झाल्याचा दावा केला असून, हा लोकशाहीची “हत्या” असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तांतर प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले असून, राज्यपालांच्या पुढील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. परिस्थिती लवकरात लवकर स्पष्ट होऊन स्थिर सरकार स्थापन होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.