इस्लामाबाद,
US Embassy in Peshawar closed पाकिस्तानमध्ये सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने महत्त्वाचा निर्णय घेत पेशावरमधील आपले वाणिज्य दूतावास टप्प्याटप्प्याने बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अफगाण सीमेलगत असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात वाढत्या अस्थिरतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दूतावासाशी संबंधित सर्व कामकाज आता राजधानी इस्लामाबादमधील अमेरिकेच्या मुख्य दूतावासाकडे सोपवण्यात येणार आहे. या भागात अतिरेकी हालचाली वाढल्यामुळे राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली होती. विशेषतः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेचा प्रभाव वाढत असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या अधिकाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे की, पेशावरमधील दूतावास बंद करण्यात येत असला तरी पाकिस्तानबरोबरचे व्यापक संबंध कायम राहतील. व्यापार, प्रादेशिक स्थैर्य आणि सामरिक हितसंबंध यांसाठी अमेरिका आपला सहभाग पुढेही ठेवणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इस्लामाबाद, कराची आणि लाहोर येथील उर्वरित राजनैतिक केंद्रांद्वारे कामकाज सुरू राहील.हा निर्णय केवळ सुरक्षेपुरता मर्यादित नसून खर्च नियंत्रणाशीही संबंधित असल्याचे समोर आले आहे. दूतावास बंद केल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही काळापासून या निर्णयाचा आढावा सुरू होता आणि अखेर तो अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.पेशावरमधील दूतावास ऐतिहासिकदृष्ट्या अफगाणिस्तानाशी संबंधित अमेरिकेच्या कारवायांसाठी महत्त्वाचा मानला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत तेथील कामकाज चालू ठेवणे कठीण झाल्याने ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता येथील सेवा इस्लामाबादमधूनच दिल्या जाणार असून, आवश्यक यंत्रणा आणि साधनसामग्री तेथे हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे.