नवी दिल्ली,
Will Dhoni retire on May 18 इंडियन प्रीमियर लीगच्या २०२६ हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास सुरू असताना संघाचा आधारस्तंभ मानला जाणारा महेंद्रसिंग धोनी मात्र अद्याप मैदानापासून दूरच आहे. दुखापतीमुळे एकही सामना खेळता न आल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आले आहे.अलीकडेच सामाजिक माध्यमांवर २०२१ मधील धोनीचे एक जुने विधान पुन्हा व्हायरल झाले आहे. त्या वेळी त्याने आपला शेवटचा सामना चेन्नईत, आपल्या चाहत्यांसमोर खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता या हंगामातील चेन्नईचा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना १८ मे रोजी होणार असल्याने हा सामना धोनीचा अखेरचा ठरू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे.
या हंगामात पोटरीच्या दुखापतीमुळे धोनी एकाही सामन्यात सहभागी होऊ शकलेला नाही. सुरुवातीला तो काही सामने गमावेल असे सांगण्यात आले होते, मात्र अद्याप त्याचे पुनरागमन झालेले नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठीही तो संघासोबत प्रवास करू शकला नव्हता, कारण तो चेन्नईत उपचार घेत आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाबाबत अनिश्चितता कायम आहे. धोनीच्या अनुपस्थितीचा परिणाम चेन्नईच्या कामगिरीवरही जाणवत आहे. संघाला अपेक्षित यश मिळालेले नसून ते सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. आगामी सामने संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून चाहत्यांचे लक्ष आता १० मे रोजी होणाऱ्या लखनौविरुद्धच्या सामन्याकडे लागले आहे. त्या सामन्यात धोनी मैदानात उतरतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.दरम्यान, संघातील इतर खेळाडूंनाही दुखापतींचा फटका बसला आहे. त्यामुळे चेन्नईसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत धोनीचे पुनरागमन आणि त्याच्या भविष्यासंदर्भातील निर्णय हेच या हंगामातील सर्वात चर्चेचे विषय ठरत आहेत.