वाढते तापमान, विजेचा लपंडाव, वृक्षांची कमतरता

या समस्येला सामोरे जात आहेत शहर, तालुक्यातील नागरिक

    दिनांक :06-May-2026
Total Views |
तालुका वार्तापत्र
सतीश पापळकर,
दारव्हा,
yavatmal-rising-temperatures : यावर्षीही उन्हाळ्याला थोडी आधीच सुरुवात झाल्याचे चित्र असून तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर्षी तापमानाने जुने ‘रेकॉर्ड’ तोडल्याचे चित्र आत्ताच दिसून येत आहे. त्यामध्ये भरीस भर म्हणजे विजेचा लपंडाव यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होत आहे. जागतिक तापमानामुळे याहीवर्षी उन्हाळ्याला मार्चपूर्वीच फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. हळूहळू तापमान वाढतच आहे. जसजसे तापमान वाढते तसतसे आपण कूलर, एसीचा वापर करायला लागतो.
 
 
YTL
 
 
प्रदूषण, हवामान बदल, जागतिक तापमानातील वाढ, अवर्षण, विजेचा लपंडाव, काही ठिकाणी पाणीटंचाई व नवनवीन आजार या असंख्य समस्यांमुळे सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे. प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे कूलर, एसी घरी असले तरी त्याकरिता लागणारी वीज महत्वाची आहे.
 
 
नेमकी उन्हाळ्यात विजेची मागणी वाढीव असल्याने आणि त्यातही होणारा विजेच्या लपंडावामुळे उन्हाळ्यात आवश्यक असणारी विद्युत उपकरणे बरेचदा विजेअभावी निकामी ठरतात. त्यावेळेस झाडांकडे पाहिल्या जाते, तेव्हा त्याची कमतरता जाणवते.
 
 
 
विद्यमान स्थितीतील जागतिक तापमानाची भयंकर समस्या विचारात घेतली तर वृक्ष लागवड करणे व वृक्ष संगोपन करणे ही भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरत आहे. ज्या सुज्ञ मंडळींनी आपल्या परिसरात कडुनिंब, आंबा व इतर दोन चार देशी झाडे लावली आहेत. त्यांच्या घर परिसरातील तापमान दोन-तीन डिग्रीने कमीच राहते हाही अनुभव आहेच. यावरून वृक्षाचे महत्व आपल्या लक्षात येत असेलच.
 
 
संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे..’ या अभंगातून मानवाला निसर्ग संवर्धनार्थ वृक्षाप्रती कृतज्ञ राहून वृक्षारोपण, वृक्षसंगोपन करण्याकरिता प्रबोधन केले आहे. जागतिक तापमान वाढ ही समस्या दिवसेंदिवस अति गंभीर होत आहे. विदर्भात एप्रिलमध्ये अकोला 46.9, अमरावती 46.8, वर्धा 46.4, यवतमाळ 46, बुलढाणा 45.5, चंद्रपूर 45, नागपूर 45.4, वाशीम 44.4, भंडारा 44 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान नोंदवल्या गेले आहे. अजूनही मे महिना बाकी आहे. तापमानावर नियंत्रण मिळविण्याचे काम व निसर्ग संतुलन फक्त वृक्षांच्या माध्यमातूनच होऊ शकते. हे सत्य आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे.
 
 
यावरून वृक्षाचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या घर व परिसरात, मंदिर परिसरात, रस्त्याच्या बाजूने, शेतात, वृक्षारोपण व संगोपन करून आपल्या नातू, पणतूंना प्रदूषणमुक्त जगण्यासाठी पुरेशी शुद्ध हवा व पाणी पुरेसे मिळावे, थंड हवा, तापमान 40 डिग्रीच्या खाली राहावे, या उद्देशाने निसर्ग संतुलनाच्या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलणे अत्यावश्यक आहे.