अवकाळी पावसामुळे झाडाखाली थांबलेल्या प्रवाशांचे थोडक्यात प्राण वाचले
बुलढाणा:
ST-Two-wheeler accident चिखली महामार्गावरील हतनी फाट्याजवळ बुधवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक दुचाकी पैकी सुमारे 6 ते 7 दुचाकींना जोरदार धडक दिल्याने एकच खळबळ उडाली. या अपघातात दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. माहितीनुसार, दुपारी 3 वाजताच्या सुमारास परिसरात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी महामार्गावरून प्रवास करणारे अनेक दुचाकीस्वार हतनी फाट्याजवळील झाडाखाली थांबले होते. त्यांनी आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या करून स्वतः सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला होता.
ST-Two-wheeler accident याचदरम्यान चिखलीकडून बुलढाण्याकडे जाणारी भुसावळ आगाराची एसटी बस (क्रमांक MH 20 BL 2992) अचानक अनियंत्रित झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या खाली उतरली आणि कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर आदळली. घटनेच्या वेळी सर्व दुचाकीस्वार झाडाखाली उभे असल्याने मोठा अनर्थ टळला. जर दुचाकींवर बसलेले असते, तर गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती. यावेळी तेथे उभे असलेल्या दुचाकींपैकी जवळपास 6 ते 7 दुचाकींचे नुकसान झाले असून एसटीचे सुद्धा नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. काही काळत महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पुढील तपास सुरू आहे