कोलकाता,
Allegation of Shubhendu Adhikari पश्चिम बंगालचे भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय सहकारी आणि वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शुभेंदू अधिकारी यांनी ही हत्या अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला. हल्लेखोरांनी अनेक दिवस रेकी करूनच हा कट रचल्याचा दावा करत राज्यातील गुंडगिरीविरोधात कठोर भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अधिकारी यांनी चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत कायदा हातात न घेण्यास सांगितले. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेसोबतच बसीरहाटमध्ये एका भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार आणि बारानगरमध्ये दुसऱ्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला झाल्याचा उल्लेख करत, हे सर्व प्रकार एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही या घटनेची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षातील वरिष्ठ नेते आणि आमदार घटनास्थळी दाखल झाल्याची माहितीही समोर आली आहे.
चंद्रनाथ रथ यांच्यावर बुधवारी रात्री मध्यमग्राम परिसरातील जेस्सोर रोडजवळ हल्ला झाला होता. ते कारने प्रवास करत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून जवळून गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भाजप नेत्यांनी या घटनेला लक्ष्य करून केलेला राजकीय हल्ला असल्याचा आरोप केला आहे. हल्लेखोरांनी थेट चंद्रनाथ रथ यांनाच लक्ष्य केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसनेही या घटनेचा निषेध नोंदवत न्यायालयाच्या देखरेखीखाली केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी केली आहे. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले.