महसूल विभागात खळबळ जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक

    दिनांक :07-May-2026
Total Views |
बीड
Avinash Pathak जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि वाढीव मोबदला प्रकरणातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी अटक केली आहे. लातूर येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिवसभर चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी दूरध्वनीवरून अटकेची माहिती दिली. पाठक यांना अटक केल्यानंतर बीड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
 
Avinash Pathak
 
 
 
काय आहे प्रकरण
 
 
राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणातील कथित 73 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे आधीच जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात अविनाश पाठक यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडे होता. मात्र त्या रजेवर गेल्यानंतर तपासाची जबाबदारी एम. व्यंकटराम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.या प्रकरणातील तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या जमिनींच्या संपादनावेळी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या वाढीव मोबदल्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून खोटे आदेश तयार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या बनावट आदेशांच्या आधारे सरकारची तब्बल 73 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
 
 
तपास यंत्रणेनुसार, राष्ट्रीय Avinash Pathak  महामार्ग अधिनियमांतर्गत संपादित जमिनींना वाढीव मोबदला मिळवण्यासाठी संबंधित खातेदार जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करतात. अविनाश पाठक यांची 22 एप्रिल 2025 रोजी बदली झाल्यानंतरही त्यांच्या कार्यकाळातील मागील तारखांचे बनावट आदेश तयार करण्यात आले. या आदेशांमध्ये बनावट सह्या आणि जुन्या तारखांचा वापर करून तब्बल 154 प्रकरणांमध्ये 241 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला होता. यापैकी अंदाजे 73 कोटी 4 लाख रुपये संबंधित खातेदारांना वितरित करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.विशेष म्हणजे, या आदेशांबाबत कोणतीही अधिकृत नोंद, रजिस्टर किंवा दस्तऐवज भूसंपादन समन्वय कार्यालयात उपलब्ध नसल्याचेही तपासात आढळून आले आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवहारात संगनमताने मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.एसआयटीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.